डायनासोरचा इतिहास आणि त्यांचा अंत | History of Dinosaurs in Marathi

डायनासोरचा इतिहास आणि त्यांचा अंत: १६ कोटी वर्षांचे थरारक रहस्य | History of Dinosaurs in Marathi

एक क्षणासाठी आजच्या या वेगवान जगाला विसरून जा आणि अशी कल्पना करा की पृथ्वीवर अजून माणसांचा काहीही मागमूस नव्हता. आपण माणसं (होमो सेपियन्स) या विशाल पृथ्वीच्या अब्जावधी वर्षांच्या इतिहासाच्या घड्याळात अगदी तासाहून कमी काळासाठी आलेले पाहुणे आहोत (सुमारे २ ते ३ लाख वर्षांपूर्वी). पण आपल्याआधी, ज्यांनी जवळजवळ १६ ते १८ कोटी वर्षे या पृथ्वीवर एकहाती राज्य केलं, त्यांची ताकद कल्पनेपेक्षाही जास्त होती.

त्यांचे एक पाऊल पडले की जमीन थरथरायची आणि एका भीषण गर्जनेने आकाश दुमदुमून जायचे. पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात ज्यांच्या नावाने धडकी भरायची, ते प्रचंड जीव म्हणजे डायनासोर (Dinosaurs) होते. आज आपण या हरवलेल्या जगाचा इतिहास उलगडणार आहोत. ते किती प्रचंड होते, त्यांची गती आणि त्यांची ताकद कशी होती, हे सविस्तर जाणून घेऊया.

‘डायनासोर’ शब्दाचा अर्थ आणि पार्श्वभूमी

डायनासोर या शब्दाचा मूळ अर्थ “भीषण सापसदृश प्राणी” (Terrible Lizard) असा होतो. पण हे प्रचंड जीव रातोरात आकाशातून पडले नाहीत. त्यांचा उगम समजून घेण्यासाठी आपल्याला काळाचे चक्र थोडे मागे फिरवावे लागेल.

१. पृथ्वीची निर्मिती आणि सुरुवातीचे जीव

४.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी लाव्हाच्या ज्वलंत गोळ्यासारखी होती (Hadean Eon). हळूहळू ती थंड झाली आणि महासागर तयार झाले. सुमारे ३.५ अब्ज वर्षांपूर्वी महासागरांमध्ये जीवनाची पहिली ठिणगी पेटली— सूक्ष्मजीव आणि सायनोबॅक्टेरिया जन्माला आले, ज्यांनी वातावरणात ऑक्सिजन भरला.

त्यानंतर अनेक युगे उलटली:

  • कॅम्ब्रियन युग: समुद्रात ‘अ‍ॅनोमालोकारिस’ (Anomalocaris) सारखे पहिले सुपर शिकारी तयार झाले.

  • डेव्होनियन काळ (माशांचे युग): समुद्रात महाकाय मासे आले. याच काळात टिकतालिक (Tiktaalik) सारख्या माशांनी मजबूत पंखांचा वापर करून उथळ पाण्यातून जमिनीकडे येण्याचा मार्ग शोधला. यातूनच जमिनीवर राहू शकणारे पहिले ‘उभयचर’ (Amphibians) प्राणी तयार झाले.

  • पर्मियन काळ: सुमारे २९५ दशलक्ष वर्षांपूर्वी ‘डायमेट्रोडॉन’ (Dimetrodon) नावाचा प्राणी अस्तित्वात होता. अनेक लोक याला डायनासोर समजतात, पण तो खऱ्या अर्थाने सस्तन प्राण्यांचा (आपला) नातेवाईक होता.

२. महाप्रलय आणि डायनासोरचा उगम (Rise of Archosaurs)

सुमारे २५० दशलक्ष वर्षांपूर्वी, पृथ्वीवर एक मोठा महाप्रलय (The Great Dying) आला. ज्वालामुखींचे स्फोट आणि हवामान बदलामुळे पृथ्वीवरील ९०-९५% जीव नष्ट झाले. पण उरलेल्या ५% जीवांमधून उत्क्रांती सुरू राहिली आणि त्यातून आर्कोसॉर (Archosaurs – शासन करणारे सरडे) तयार झाले.

हे आर्कोसॉर सामान्य सरड्यांसारखे नव्हते. इतर सरपटणारे प्राणी (उदा. मगर) पाय बाजूला पसरून चालतात. पण या नव्या जीवांनी आपले पाय थेट शरीराच्या खाली सरळ रेषेत आणले. या एका बदलामुळे ते थकता वेगाने धावू शकले आणि शिकारीसाठी त्यांचे पुढचे हात मोकळे झाले. याच क्रांतीमुळे ते पृथ्वीचे सम्राट बनले.

डायनासोरचे सुवर्णयुग: मेसोझोइक युग (The Mesozoic Era)

डायनासोरच्या या विशाल काळाला ‘मेसोझोइक युग’ म्हणतात. याला तीन महत्त्वाच्या भागांमध्ये विभागले जाते:

१. ट्रायसिक काळ (Triassic Period)

  • वेळ: सुमारे २५० ते २०१ दशलक्ष वर्षांपूर्वी.

  • परिस्थिती: तेव्हा सर्व खंड एकत्र जोडलेले होते, ज्याला ‘पँजिया’ (Pangea) म्हणत. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण आजच्या तुलनेत खूप कमी (१५%) होते.

  • सुरुवातीचे डायनासोर: सुरुवातीचे डायनासोर आजच्या चित्रपटांत दाखवतात तसे विशाल नव्हते. ते लहान, चपळ आणि दोन पायांवर चालणारे होते. इओरॅप्टर (Eoraptor) हा सुमारे १० किलो वजनाचा डायनासोर याचे उत्तम उदाहरण आहे.

  • आकाशातील राज्य: आकाशात डायनासोरचे नातेवाईक ‘प्टेरोसॉर’ (Pterosaurs) उडत होते (उदा. Eudimorphodon). जमिनीवर प्लेटोसॉरस सारखे शाकाहारी आणि हेररासॉरस सारखे शिकारी डायनासोर उदयाला आले.

२. जुरासिक काळ (Jurassic Period)

  • वेळ: सुमारे २०० ते १४५ दशलक्ष वर्षांपूर्वी.

  • परिस्थिती: ‘पँजिया’ खंड तुटायला लागला. पाऊस वाढल्याने घनदाट जंगले तयार झाली. ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्यामुळे प्राण्यांचा आकार प्रचंड मोठा होऊ लागला.

  • सॉरोपोड्स (महाकाय शाकाहारी): या काळात लांब मानेचे डायनासोर तयार झाले. ब्रॅकिओसॉरस (Brachiosaurus) चे वजन ५० टन (१० आफ्रिकन हत्तींएवढे) आणि उंची १३ मीटर होती. डिप्लोडोकस (Diplodocus) सारखे जीव आपली लांब शेपटी चाबकासारखी फिरवून शत्रूला पळवून लावायचे.

  • कवचधारी डायनासोर: पाठीवर ताटल्यांसारखे कवच आणि शेपटीवर काटे असलेला स्टेगोसॉरस (Stegosaurus) याच काळात होता.

  • शिकारी (Theropods): जुरासिक काळात अलोसॉरस (Allosaurus) हा सर्वात धोकादायक शिकारी होता, जो झुंडीने शिकार करत असे.

३. क्रिटेशियस काळ (Cretaceous Period)

  • वेळ: १४५ ते ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी.

  • बदल: या काळात पृथ्वीवर पहिल्यांदाच रंगीबेरंगी फुले फुलली आणि कीटक वाढले.

  • संरक्षणात्मक शाकाहारी: ट्रायसेराटॉप्स (Triceratops) ज्याच्या चेहऱ्यावर ३ शिंगे होती आणि अंकायलोसॉरस (Ankylosaurus) जो एका चालत्या टँकसारखा होता, ते याच काळातले. हॅड्रोसॉर (बदकासारखी चोच असणारे) डायनासोरही मोठ्या संख्येने होते. सर्वात मोठा शाकाहारी प्राणी आर्जेंटिनोसॉरस (Argentinosaurus) (वजन ८०-९० टन) याच काळात होऊन गेला.

महाभयंकर शिकारी डायनासोर (Apex Predators)

क्रिटेशियस काळात शिकारी डायनासोर त्यांच्या उत्क्रांतीच्या शिखरावर पोहोचले:

  • राजा सॉरस (Rajasaurus): भारताच्या गुजरात (नर्मदा खोरे) मध्ये सापडलेला हा एक अत्यंत घातक शिकारी डायनासोर होता.

  • स्पायनोसॉरस (Spinosaurus): हा पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा मांसाहारी डायनासोर होता. टी-रेक्सपेक्षाही मोठा (१५-१६ मीटर लांब) असलेला हा डायनासोर पाण्यातही शिकार करत असे. त्याच्या पाठीवर २ मीटर उंच हाडांचा ‘पाल’ होता.

  • समुद्री राक्षस: डायनासोर नसले तरी मोजासॉरस (Mosasaurus) सारखे १८ मीटर लांब समुद्री राक्षस पाण्यावर राज्य करत होते.

  • टी-रेक्स (Tyrannosaurus Rex): ‘हुकूमशहा सापराजा’ म्हणून ओळखला जाणारा टी-रेक्स हा क्रिटेशियस काळाचा निःसंशय सम्राट होता. १३ मीटर लांब, ९ टन वजन आणि केळीच्या आकाराचे करवतीसारखे तीक्ष्ण दात असलेला हा जीव एका चाव्यात हाडे फोडण्याची ताकद ठेवत असे.

डायनासोरचा भयानक अंत (The Extinction)

हे प्रचंड जीव त्यांच्या वैभवाच्या शिखरावर असतानाच, आकाशातून त्यांच्यावर मृत्यू चालून आला.

अंदाजे ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी, मेक्सिकोमधील ‘चिक्सुलुब’ (Chicxulub) जवळ माउंट एव्हरेस्टपेक्षाही मोठा (१०-१५ किलोमीटर रुंद) एक लघुग्रह (Asteroid) पृथ्वीवर प्रचंड वेगाने आदळला. या धडकेतून निर्माण झालेल्या ऊर्जेमुळे उष्णतेची लाट आणि भयानक त्सुनामी आली. आकाशात पसरलेल्या धुळीमुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोहोचू शकला नाही. वनस्पती सुकल्या, अन्नसाखळी तुटली आणि १६ कोटी वर्षे राज्य करणाऱ्या डायनासोरचे साम्राज्य पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळले. या विनाशामध्ये पृथ्वीवरील ७५% जीव नष्ट झाले.

नव्या युगाची सुरुवात…

या प्रलयातून जमिनीखाली बिळांमध्ये लपणारे काही छोटे सस्तन प्राणी (Mammals) बचावले आणि तिथूनच माणसाच्या उत्क्रांतीचा मार्ग मोकळा झाला. तसेच, डायनासोर पूर्णपणे संपले नाहीत; आज आपण खिडकीबाहेर उडताना पाहतो ती चिमणी आणि इतर पक्षी हे त्याच महान डायनासोरचे आधुनिक वारसदार आहेत!

थोडक्यात सांगायचे तर, निसर्गासमोर कोणाचेही काही चालत नाही. निसर्गात कोणीही कायमचा राजा नसतो!

Also read

History of Earth in Marathi

Leave a Comment